ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून
पुणे -संकटसमयी आम्ही एक असतो, ही एकजूट अत्यंत मजबूतपणे दिसते याचा प्रत्यय आज संपूर्ण जिल्ह्यातील गावागावांत आला. खंबीर व मजबूत पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी करोनाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला 100 टक्के प्रतिसाद दिला.
तर सायंकाळी 5 वाजता जिल्ह्यातील गावागावांतील नागरिक खिडकी, बालकनी, टेरेस, घराच्या अंगणात येत टाळ्या, थाळी, घंटा, शंख नाद करीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानले.
दिवसभर करोना विषाणूचा धोका पत्करत डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलीस, माध्यम प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि इतर अनेकजण यांनी आपली सेवा बजावली.
यासर्वांचे यावेळी जिल्ह्यातील घराघरांतून अभार मानण्यात आले. काही नागरिकांनी “भारतमाता की जय’, “वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या. तसेच टाळ्यांचा कडकडाट, शंखनाद आणि घंटानाद केला.