खेड तालुक्यातील मोठ्या परिसरासह छोट्या-गल्लीबोळातही शुकशुकाट
राजगुरूनगर -“जनता कर्फ्यू’ला राजगुरुनगर शहरातून 100 टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. पुणे-नाशिक महामार्गावर शुकशुकाट होता, आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच महामार्ग इतका निर्मनुष्य पहिल्यांदाच पाहिला असेल कदाचित.
खेड तालुकयत सकाळपासूनच नागरिकांनी घरात बसने पसंत केल्याने रस्त्यावर बाजारात शुकशुकाट आहे. कोणीही घराबाहेर पडत नसल्याने भयाण शांतता होती. मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. एरवी वाहतूक कोंडीने फुललेला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर केवळ 1 टक्केही वाहतूक नाही सर्वत्र भयाण शांतता असून करोना हद्दपार करण्यासाठी आज पाळण्यात आलेल्या “जनता कर्फ्यू’ यशस्वी झाला असला तरी नागरिकांनी पुढील काही दिवस घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राजगुरूनगरात “त्या’ कुटुंबाबत चर्चा
दावडी – राजगुरूनगर शहरातील एक नामांकित इमारतीमध्ये परदेशातून चार जण शनिवारी (दि. 21) दुपारच्या सुमारास आले असल्याची माहिती देऊनही प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. या ठिकाणी असलेल्या इतर सदनिकामधील नागरिकांनी कुटुंबासह तेथून पळ काढला. सुमारे तीन तास चाललेल्या नाट्य पाहण्यासाठी लांबूनच बघ्यांची गर्दी झाली. तर अनेकांनी घटनेचे गांभीर्य सांगितल्यानंतर आरोग्य विभागाचे वाहन त्या ठिकाणी दाखल झाले; मात्र या वाहनात असलेल्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही संरक्षण साहित्य सोबत नसल्याने आरोग्य विभाग करोना या विषाणूचा सामना करण्यासाठी कितपत तयारीत आहे हे यावरून दिसून येते, अशी चर्चा राजगुरूनगरात आहे.
शहरातील नागरिक गावाकडे येत असल्याने स्थानिक आरोग्य केंद्राच्यामाध्यमातून त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. लहान मुले वृद्ध नागरिकांनी घराबाहेर शक्यतो पडू नये. गर्दीत जाणे टाळावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समित्यांमध्ये तालुका निहाय कक्ष स्थापन केला असून त्याद्वारे माहिती व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
– निर्मला पानसरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
खेड आंबेगाव तालुक्यात राजगुरूनगर आगाराच्या दररोज सुमारे 550 खेपा होत आहेत.दररोज 25 हजार किमी प्रवास होतो. रोजचे उत्पन्न 10 लाखांच्या जवळपास असते. सध्या उत्पन्नात दररोज 5 लाखाची घट झाली आहे. “जनता कर्फ्यू’ला एसटी महामंडळाने पाठिंबा देत असून सगळ्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहे.
– रमेश हांडे, आगार प्रमुख, खेड
“करोना’बाबत कोणी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. तालुक्यात तीन ग्रामीण रुग्णालये असून त्यात करोना संशयित व बाधित रुग्णांसाठी वेगळी सोय केली आहे. तालुक्यात 24 परदेशी जाऊन आलेले नागरिक आले आहे. त्यांना त्याच्या घरात 14 दिवस थांबविण्यात आले आहेत. त्यामागे आरोग्य कर्मचारी आहेत. 24 पैकी कोणीही पॉझिटिव्ह नाही. खबरदारी म्हणून त्यांना त्यांच्या घरात वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे.
– बी. बी. गाढवे, वैद्यकीय अधिकारी, खेड तालुका
तालुक्यात आज सर्वत्र जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तरीही काहीजण रत्यावर आले आहेत. त्यांना पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंध केला आहे. न ऐकणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
– गजानन टोम्पे, पोलीस उपअधीक्षक