खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणाऱ्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायाला तोटा
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : दुकाने, हॉटेल्स बंद
पुणे- करोनाच्या प्रादुर्भावाचा फटका आता खाद्यपदार्थ व्यावसायिकांनादेखील बसला आहे. कायमस्वरुपी तेजीत असणाऱ्या आणि खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणाऱ्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायाला चांगलाच तोटा सहन करावा लागत आहे.
दिवसेंदिवस करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स बंद ठेवली आहेत.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने सहजपणे नागरिक बाहेरचे पदार्थ खाण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे खाद्यपदार्थांचे लहान स्टॉल्स, बेकऱ्या आदी छोटे व्यावसायिकांना अधिक नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या लहान गाड्या चालवणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना प्रचंड नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
राज्यासह देशभरांतील कानाकोपऱ्यातून खाद्यपदार्थ व्यावसायिकांकडे काम करणारे अनेक जणांना आता खर्च भागवणे अवघड होत असल्याचे व्यावसायिक सांगतात. यासह येत्या काळामध्ये लग्न, मुंजी आदी मंगल कार्ये होतात. गुढीपाडवादेखील ऐन तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मार्च ते जून या कालावधीमध्ये केटरिंग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, यंदा बिकट स्थिती असल्याचे चित्र आहे.
केटरिंग व्यावसायिक सांगतात…
मागील आठ दिवसांपासून खाद्यपदार्थांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. मंगल कार्ये, धार्मिक कार्यक्रम, विविध घरगुती कार्यक्रम, गुढीपाडव्याच्या निमित्ताने असणाऱ्या “ऑर्डर्स’सह आमच्या नियमित “ऑर्डर्स’देखील नागरिक आणि व्यावसायिक रद्द करत आहेत. केटरिंग व्यावसायिकांकडील मदतनीस आणि कामगार वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
– प्रफुल्ल खरे
आम्ही मागील काही दिवसांपासून हॉल आणि केटरिंग सर्व्हीस बंद ठेवली आहे. नव्याने लग्न, मंगल कार्यांसाठी नागरिक बुकींग करत नसून, लग्नासाठी यापूर्वी केलेले बुकींग सर्वजण रद्द करत आहेत. करोनाच्या धास्तीमुळे नागरिक केटरिंगच्या देखील “ऑर्डर्स’ रद्द करत आहेत. सध्या आम्ही काही विद्यार्थ्यांना विनाशुल्क जेवणाची सेवा पुरवत आहोत.
– अर्चना शाळीग्राम
केटरिंग व्यवसायावर 100 टक्के परिणाम झाला आहे. 15 मार्चपासून सर्वाधिक फटका बसला आहे. “केटरिंग मार्केट’ पूर्णपणे बंद आहे. विविध कार्यक्रम रद्द होत आहेत. त्यामुळे बहुतांश जण “ऑर्डर्स’ रद्द करत आहेत. मार्केटयार्डदेखील बंद असल्याने चांगल्या भाज्या उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत.
– ऋषीकेश कुलकर्णी