डिसेंबर महिना म्हटले की, थंडी आणि पार्ट्यांचा हंगाम. सध्या करोनाच्या सावटामुळे पहिल्यासारख्या पार्ट्या होणार नाहीत परंतु हॉटेलमधून पार्सल मागवून किंवा घरीच चविष्ट-चमचमीत पदार्थ शिजवून पार्टी करण्याचे नियोजन सुरु झाले आहे. खाद्यपदार्थ आणि उंची वाईन म्हटले की जगात फ्रान्सचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. विशेष म्हणजे या देशातील लोकांचा रोजचा खाण्यापिण्यासाठी जाणारा वेळ हा सरासरी 2 तास 13 मिनिटे एवढा आहे. वाईन हा तिथल्या आहारातील एक जिन्नस मानला जातो. त्यामुळे वाईनचे घुटके घेत आरामात जेवण करणे हे फ्रान्ससाख्या देशात स्वाभाविक मानले जाते.
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेने जगभरातील अनेक देशांमधील लोकांचे राहणीमान आणि जीवनशैलीसंदर्भातील आकडेवारी सादर केली आहे. त्यानुसार फ्रान्समधील लोकांचा आहार हा गेली कित्येक शतके आरोग्यदायी आहार म्हणून पथदर्शी मानला जातो. इथल्या लोकांचा संतुलित आहारावर भर असतो. त्यामध्ये भाज्या आणि फळांबरोबरच टोमॅटो आणि ऑलिव्हसारख्या फळांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. सर्वसाधारणपणे फ्रान्समधील कुटुंबियात प्रत्येकाचा आहार वेगवेगळा असतो. प्रत्येकाची शारिरिक-मानसिक गरज पाहून तो तयार केलेला असतो.
फ्रान्सनंतर क्रमांक लागतो तो इटलीचा. स्वाभाविकपणे इटली युरोपातील देश असल्याने त्यांची आहारपद्धती फ्रान्सशी मिळतीजुळती आहे. इटलीतील लोक खाण्यापिण्याचे अतिशय शौकिन आहेत. इटलीमध्ये वर्षभर कुठे ना कुठे फूड फेस्टिव्हल चालूच असतात. इटलीतील नागरिक रोज सरासरी खाण्यासाठी दोन तास सात मिनिटांच वेळ घेतात.
स्पेन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात ज्याप्रमाणे अन्न हे पूर्णब्रह्म असे मानले जाते त्याप्रमाणे स्पेनमध्ये अन्नाला ईश्वराचे वरदान मानले जाते. इथले लोक कधीही जेवण चालू असताना उठत नाही. त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत इथे अन्न वाया जाण्याचे प्रमाण अल्प आहे.
चौथ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. इथल्या लोकांना रोज जेवणासाठी सरासरी 1 तास 45 मिनिटांचा वेळ लागतो. दक्षिण कोरियात जेवण आणि झोप या गोष्टींना अतिशय महत्त्व दिले जाते. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियातील पारंपारिक पदार्थ साधारणपणे सारखेच आहेत. त्यामुळेच या देशांमध्ये जेव्हा शांतता बोलणी होतात तेव्हा अर्थातच मेनूकार्डमध्ये कोणते पदार्थ असावेत याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते.
या यादीत चीन पाचव्या क्रमांकावर आहे. इथल्या खाण्याच्या सवयी कोरियाशी बऱ्याच प्रमाणात मिळत्याजुळत्या आहेत. चीनमध्ये पाश्चिमात्य धर्तीवरील खाण्याबरोबरच स्थानिक चवीच्या पदार्थांबाबत प्रयोग केले जातात. त्यामुळे तेथील अस्सल चवीवर परिणाम झालेला आहे. चीनमध्ये स्वयंपाकासाठी भरपूर वेळ दिला जातो. जेणेकरून पदार्थ स्वादिष्ट व्हावेत. चीनी नागरिक खाण्यासाठी रोज सरासरी 1 तास 40 मिनिटांचा वेळ घेतात.
रोज जेवणासाठी सुमारे 1 तास 35 मिनिटांचा वेळ घेणार जर्मनी या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्यानंतर लगेचच जपानचा क्रमांक लागतो. जपानमध्ये आरोग्यदायी पदार्थांवर भर दिला जातो. अन्य विकसित देशांच्या तुलनेत जपानमधील लोक बाहेर खाण्याला फार पसंती देत नाहीत. बहुतेक लोक घरी वाफेवर शिजवलेले किंवा ग्रिल्ड फूड कुटुंबातील सगळे एकत्र बसून खातात. भरपूर पायी चालणे हे देखील इथल्या लोकांच्या चांगल्या आरोग्याचे गुपित आहे.
जपाननंतर आठव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आणि नॉर्वेचा नंबर लागतो. नवव्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. भारतातील लोक रोज खाण्यासाठी सरासरी 1 तास 24 मिनिटांचा वेळ घालवतात. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे स्वयंपाकाची तयारी आणि प्रत्यक्ष स्वयंपाक यासाठी भारतात जास्त वेळ घेतला जातो.