भिगवण – करोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असला तरी निसर्गाने मात्र या मानवी निर्बधांचा लवलेशही प्रदर्शित न करता मानवी अनुउपस्थितीचा जल्लोषच केलेला दिसून येत आहे. उजनीच्या पाणवठ्यावर हे प्रकर्षाने जाणवत आहे. उजनी हे देशी, परदेशी पक्ष्यांचे नंदनवन समजले जाते. या ठिकाणी थंडीच्या हंगामात अनेक परदेशी पक्षी येत असतात.
देशी व स्थानिक पक्षांची संख्या सुद्धा मोठी आहे. यंदा झालेला भरपूर पाऊस आणि उजनीमध्ये पक्ष्यांसाठी अत्यंत पुरक अशा प्रकारचे वातावरण आहे.
मागील सुमारे तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊनमुळे नदी पात्रात माणसांची वर्दळ नाही. मासळी बाजार असल्याने मासेमारी बंद आहे. पक्षी पर्यटनही थांबले आहे. माणसांचा संपर्क नदीपात्रात अत्यंत कमी असल्याने पक्षांना मोठ्या प्रमाणात मोकळीक मिळाली आहे. बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांचीही अद्याप मोठ्या संख्येने रेलचेल आहे.
यामध्ये फ्लेमिंगो, चक्रवाक बदक, नदीसुरय, कुरकीरा, करकोचा आदी पक्षी मोठ्या संख्येने आले आहेत. यंदा फ्लेमिंगो थव्याने फिरताना दिसत आहे. चंबळच्या खोऱ्यातून येणाऱ्या नदीसुरय आणि कुरकीराया पक्ष्यांची छोटी पिल्ले बाहेर आली आहेत. आसामवरून येणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचा अद्यापही मोठ्या संख्येने दिसत आहे. सिगल पक्ष्यांचे तीन ते चार प्रकार याठिकाणी पहायला मिळतात. त्यांची संख्याही भरपूर आहे.
करड्या, पांढऱ्या अशा विविध रंगाचे व आकारातील बगळे, चित्रबलाक, करड्या रंगाचा करकोचा, वकील, वंचक, कुदळ्या, वारकरी बदक आदी प्रकारचे स्थानिक पक्षी उजनी धरणपात्रात मुक्तपणे बागडत आहेत. माणसांचा लॉकडाऊन पक्ष्यांसाठी मात्र मोकळीकीचा काळ ठरला आहे. मासेमारी बंद असल्याने पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. कोणत्याही भीती व वर्दळीशिवाय पक्ष्यांची मुक्तशाळा नदीकाठी भरत आहे.