जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : रुग्णदर कमी करू
पुणे – कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील करोनाचा वाढता रुग्णदर व मृत्युदर कमी व्हायला हवा. येत्या आठ दिवसांत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच रुग्ण आढळलेल्या ग्रामीण भागात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. दरम्यान यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
पुण्यातील करोनाचा वाढता रुग्णदर कमी करण्यासाठी तसेच रुग्णांवर वेळेत व योग्य प्रकारे उपचार होऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने रविवारी जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व आरोग्य विभागाची नियोजन बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जिल्ह्यातील करोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधांबाबत जिल्हाधिकारी राम यांनी आढावा घेतला. तसेच या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांच्यासाठी आवश्यक पीपीई किट, एन 95 मास्क, सर्जिकल मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, औषध साठा, बरे झालेल्या रुग्णांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी उपलब्ध शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या ऍम्ब्युलन्सची उपलब्धता व आवश्यकता, मृतदेहाबाबत घ्यावयाची दक्षता आदी विषयांबाबत तसेच जिल्ह्यात अडकलेल्या प्रवासी व कामगारांसाठीचे निवारा कॅम्प व भोजन व्यवस्था, रेशन धान्य वितरण यांचा आढावा घेतला. स्वॅब चाचणी निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना घरी पोहोचण्यासाठी पीएमपी बसेस वापरता येतील.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरी राहणे आवश्यक असून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना पासेस द्यावेत. वाहनांना इंधन पुरवठ्याची खात्री करावी. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्यांना पासेस द्यावेत.
– नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी