सोरतापवाडी-उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शुक्रवारी (दि. 7) चार जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.
चार जणांच्या संपर्कातील 15 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामध्ये 52 वर्षीय दोन ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. त्यांना प्रयागधाम हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. केसनंद येथील कंपनीत कामाला असणारा व उरुळी कांचन येथील 37 वर्षीय कामगार व एक उरुळी कांचन येथील दुकानदार यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कदमवाकस्ती येथील विश्वराज हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले आहे.
उरुळी कांचन येथील रुग्णांची एकूण संख्या 133 असुन 108 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 24 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर एका जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व हवेलीत करोनाबाधितांची संख्या वाढतच असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉ.कदम यांनी केले.