लातेहार – झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलीस शहीद झाले आहेत. त्यात सहायक पोलीस निरीक्षकाचाही समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, चांदवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लुकियातंड खेडयात सशस्त्र माओवाद्यांनी एका गस्ती व्हॅनवर गोळीबार केला. या गोळीबारात चार पोलीस मारले गेले. त्यात एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे.
मरण पावलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव सुक्रा ओरॉ असे आहे. याशिवाय गृहरक्षक जवान सिकंदर सिंह, जमुना प्रसाद व संभू प्रसाद यांचाही मृतांत समावेश आहे.
गस्ती पथकाचा सदस्य असलेला आणखी एक पोलीस हल्ल्यातून वाचला, कारण तो त्यावेळी नैसर्गिक विधीसाठी गेला होता. झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून त्यांनी चार पोलिसांच्या हल्ल्यातील मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
या घटनेची चौकशी सुरू आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठवाजता घडली. यात वाचलेल्या पोलिसाचे नाव दिनेश राम असे आहे.
मुख्यमंत्री रघुबर दास यांनी म्हटले आहे, की शूर जवानांवर लातेहार येथे करण्यात आलेला हल्ला हा भ्याड स्वरूपाचा आहे. मी या क्रूर कृत्याचा निषेध करतो. आमच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. सगळा झारखंड व देश हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे.