वाशिममध्ये शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

वाशिम – राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असतानाच वाशिममधील शिवसैनिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची न मिळाल्याने नाराज झालेल्या एका तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.

रमेश बाळु जाधव असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो वाशिम जिल्ह्यातील उमरी येथील रहिवाशी आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने रमेश जाधव हा अस्वस्थ झाला.

यामुळे नैराश्‍येतुन त्याने शनिवारी रात्री ब्लेडने स्वतःच्या हातावर वार केले. हे कृत्य एका वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने त्याला पकडत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थीर आहे. याप्रकरणी दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक चौकशीत रमेश जाधव याने मद्यपाशान केल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवारी) सकाळी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी बंड पुकारत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आदल्या रात्रीपर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याबाबत सहमती झाल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सांगत होते.

सत्तास्थापनेचा दावा करण्याबाबत जुळवाजुळवही झाली होती. त्यामुळे महाआघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद निश्‍चित मानून झोपी गेलेले सर्व जण सकाळी येऊन थडकलेल्या वृत्ताने अवाक झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.