जकार्ता – तुर्कीये आणि सीरियाच्या सीमा भागाला भीषण भूकंपाचा धक्का बसलेला असताना आता इंडोनेशियालाही मध्यम स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसला आहे. इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ प्रांताला आज हा भूकंपाचा धक्का बसला. 5.1 क्षमतेच्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे या प्रांताच्या उत्तर किनारपट्टीजवळील जयपुरा भागातील एक हॉटेल कोसळले आणि चार जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 22 किलोमीटरवर होता.
तुर्कीये आणि सीरियातील भूकंपाच्या बातम्या ताद्या असल्यामुळे या इंडोनेशियात भूकंपाचा धक्का बसल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इंडोनेशियाला पूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती.
समुद्रावर तरंगणारे हॉटेल या भूकंपाच्या धक्क्यामुळे समुद्राच्या पाण्यात कोसळले. मरण पावलेल्या चारही जणांचे म-तदेह सापडले असून हे सर्व जण हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. याशिवाय काही घरे, रुग्णालये आणि अन्य इमारतींचेही कमी जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचेही या प्रवक्त्याने सांगितले. 2 जानेवारीपासून जयपूरा शहराला तब्बल भूकंपाचे 1,079 धक्के बसले आहेत. त्यापैकी 132 धक्के नागरिकांना जाणवल्याचे या प्रवक्त्यांनी सांगितले.