नवी दिल्ली – 264 कोटी रुपयांच्या “टीडीएस’ घोटाळ्यात अभिनेत्री कृती वर्मा केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाच्या (सीबीआयच्या) रडारवर आली आहे. “सीबीआय’ने तिच्या खात्यात सापडलेले 1.18 कोटी रुपये देखील गोठवले आहेत.
2021 मध्ये गुरुग्राम, (हरियाणा) येथे कृतीच्या नावावर घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. “सीबीआय’चा तपास सुरू होताच ही मालमत्ता विकण्यात आली आणि सर्व पैसे अभिनेत्रीच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले, असा आरोप आहे.
फिल्मी कारकिर्दीला फटका?
“टीडीएस’ घोटाळ्याप्रकरणी “सीबीआय’ने लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे आणि उडुपी येथील अनेक फ्लॅटसह मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यात अभिनेत्री कृती वर्माच्या नावावर असलेल्या संपत्तीचाही समावेश आहे. कृती वर्माने यापूर्वी जीएसटी इन्स्पेक्टर पदावर काम केले आहे. नंतर सरकारी नोकरी सोडून टीव्ही शोमध्ये काम करायला तिने सुरुवात केली. कृती वर्माला एमटीव्ही रोडीज एक्स्ट्रीम आणि बिग बॉस सीझन-12 पासून ओळख मिळाली. करोडो रुपयांच्या टीडीएस घोटाळ्यात नाव आल्याने तिच्या फिल्मी कारकिर्दीला फटका बसण्याची शक्यता आहे.
डान्स शोमध्ये ओळख
अभिनेत्री कृती वर्मा मूळची दिल्लीची आहे. 2020 च्या शेवटी एका “डान्स शो’ दरम्यान, तिची ओळख टीडीएस घोटाळ्यातील आरोपी भूषण पाटील याच्याशी झाली. तिच्या नृत्यावर आणि सौंदर्यावर मोहित झालेल्या पाटील याने नंतर एक कोटी रुपये तिच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर केले. “टीडीएस’ घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचेही कृतीने म्हटले आहे.