भाटघर, वीर धरण प्रकल्पांतील गावांना लाभ ः प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखलेही मिळणार
भोर (प्रतिनीधी) – भोर तालुक्यातील भाटघर आणि वीर धरण प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणातील गावांना नागरी सुविधा पुरविणे या योजनेतंर्गत विविध विकास कामांसाठी आमदार संग्राम थोपटे यांनी लोकांची मागणी व गरज विचारात घेवून शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास शासनाने मान्यता देवून 3 कोटी 80 लाख 3 हजार 910 रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये भाटघर धरण भागातील उजव्या तीरावरील 12 गावांसाठी 1कोटी 57 लाख 19 हजार 996 रुपयांचा तर डाव्या तीरावारील 6 गावांसाठी 65 लाख 61 हजार 656 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर वीर धरण प्रकल्पातील 13 गावांसाठी 1कोटी 22 लाख 258 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दोन्ही धरण भागातील गावांमध्ये स्मशानभूमी शेड उभारणे, ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे, सामाजीक सभागृह उभारणे, नवीन नळ पाणी पुरवठा योजना सुरु करणे, रस्ते तयार करणे या सारख्या विविध नागरी सुविधांचा यामध्ये समावेश आहे.
भाटघर धरण प्रकल्प ग्रस्तांना प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखले मिळणे कामी मौजे करंदी बुद्रूक येथे आमदार संग्राम थोपटे यांनी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार संदीप पाटील यांच्या समवेत मेळावा आयोजित करुन प्रकल्प बाधितांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखले कसे काढावेत, व त्यासाठी आवश्यक असणारी कागदपञे या विषयी सखोल माहिती देण्यात आली होती. या मेळाव्यात ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली होती. त्यांना धरण प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखल्यांचे वाटपही आमदार थोपटे यांचे हस्ते करण्यात आले होते.उर्वरीत प्रकल्पग्रस्तांनाही कागदपत्रांची पुर्तता करताच दाखल्यांचे वाटप करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी मेळाव्यात जाहिर केले असल्याने धरण भागातील एकही शेतकरी दाखल्या पासून वंचित राहणार नाही असे आमदार थोपटे यांनी सांगितले.
या गावांना लाभ
भाटघर धरण उजव्या तीरावरील संगमनेर, हर्णस, माझगांव, जोगवडी, करंदी बुद्रूक, करंदी खुर्द, कांबरे बुद्रुक, कुरुंजी, मळे, डेरे, कुंबळे तरडावा, तीर भागातील भाटघर, बारे खुर्द, बारे बुद्रुक , कर्नवडी, पांगारी, डेहेण. वीर धरण प्रकल्पातील धांगवडी, निगडे, भांबवडे, टापरेवाडी, न्हावी-15, गुणंद, सांगवी हि.मा, येवली, इंगवली, आळंदे.