पुसेगाव – कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर वर्धनगड घाटातील लक्ष्मीआई मंदिराजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून शौर्य काकडे (वय 7, रा. कोरेगाव) हा जागीच ठार झाला. कोरेगाव येथील काकडे दाम्पत्य हे मुलगा शौर्यला घेऊन मोटारसायकल (एमएच-42-डब्लू-2409) वरून मोहोद, ता. सांगोला येथे निघाले होते. वर्धनगड घाटात लक्ष्मीआई मंदिरानजीक दोन ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टर (एमएच-11-सीडब्लू-6456) ला ओव्हरटेक करताना, पुढून वाहने आल्याने, काकडे यांनी मोटारसायकल थांबवली.
त्यावेळी संकेत विठ्ठल पवार (म्हासुर्णे, ता. खटाव) याने ट्रॅक्टर चुकीच्या बाजूने पुढे आणला असता, ट्रॅक्टरच्या पहिल्या ट्रॉलीची धडक शौर्यला बसली. त्यात तो खाली पडला. ट्रॉलीचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. या अपघाताची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.