सिंहगड रस्ता – नऱ्हे परिसरात भूमकर पुलाजवळ (सोमवारी) खोबरेल तेल वाहतूक करणारा टॅंकर उलटल्यानंतर 24 हजार लिटर खोबरे तेल महामार्गासह सर्व्हिंस रस्त्यावरही वाहून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत तसेच मोठ्या प्रमाणात पाणी तसेच माती टाकून निसरडा झालेला रस्ता पूर्ववत केला. परंतु, काही ठिकाणी खोबरेल तेल आणि मातीचा निसरडा राडारोडा तयार झाल्याने वाहनचालकांनी आज सावधपणे वाहने चालविली.
नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दररम्यान बाह्यवळणावर सातत्याने अपघात होत असताना यासाठीच्या उपयायोजनांडे दुर्लक्ष होत आहे. एखादा अपघात घडल्यानंतर यंत्रणा जागी होते. त्यानंतर आठवडाभर या रस्त्याची पाहणी, दौरे होतात. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अमंलबजावणी मात्र होत नाही. बाह्यवळण मार्गावर खोबरेल तेल पसरल्याने मार्ग निसरडा होऊन वाहतुकीचा वेग संथ झाल्यानंतरही प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना राबविण्यात आली असली तरी अपघात घडू नयेत यासाठीची उपाययोजना गरजेचे ठरत आहे.
कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान महामार्गाचा अभ्यास करून सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपायोजना कराव्यात. अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस तसेच रुग्णवाहिका यासह स्थानिक यंत्रणा सक्षम असली तरी अपघात रोखणेच गरजेचे आहेत. यावरील ठोस उपाययोजनांकडे मात्र संबंधीत विभागाचे दुर्लक्ष ओह.
– शेखर करपे, सामाजिक कार्यकर्ते