कोलंबो – श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याची श्रीलंका संघाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंका संघाने विजेतेपद मिळवावे यासाठी नवोदित संघाला प्रेरणा देण्यासाठी जयवर्धने कार्यरत राहणार आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाने जयवर्धनेशी एक वर्षांचा करार केला आहे.
जयवर्धने 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारेल. यासोबतच तो श्रीलंकेच्या 19 वर्षांखाली संघासोबतही काम करत राहणार आहे. तो 19 वर्षांखालील संघाचा सल्लागार प्रशिक्षक आहे. जयवर्धने आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. 2017 साली प्रशिक्षक बनताच जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आणि त्यानंतर 2019, 2020 साली देखील मुंबईने आयपीएल स्पर्धा जिंकली.
जयवर्धने आयपीएलसोबत बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टायटन्स आणि द हंड्रेडमध्ये साउथहॅम्प्टन संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. जयवर्धनेकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे.
या दिग्गज क्रिकेटपटूने 149 कसोटीत 34 शतकांच्या मदतीने 11 हजार 814 धावा केल्या आहेत. जयवर्धनेने 448 एकदिवसीय सामन्यांत 19 शतकांच्या मदतीने 12 हजार 650 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 55 टी-20 सामन्यांमध्ये 1 हजार 493 धावा केल्या आहेत.