दहिवडी, (प्रतिनिधी) – माण विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महिला कर्मचारी यांना घेण्यात आले आहे. या महिला कर्मचाऱ्यांना सोयीने राहत्या गावात किंवा जवळ ड्युटी देण्यात यावी. तसेच निवडणुकीच्या मतदानादिवशी त्यांची प्रवास व इतर बाबतीत गैरसोय होऊ नये असे नियोजन व्हावे, अशी मागणी माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने माण-खटावच्या प्रांत तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे केली आहे.
यावेळी तहसीलदार विकास अहिर, नायब तहसीलदार श्रीशैल व्हटे, संघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र अवघडे उपस्थित होते. महेंद्र अवघडे यांनी उत्तरप्रदेशच्या धर्तीवर पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असतील तर कौटुंबिक अडचणीमुळे दोघांपैकी एकासच निवडणूक कामासाठी नेमावे, दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळावे अशा मागण्या केल्या.
यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी कोणत्याही महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यास निवडणूक कामातून वगळले जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी हणमंतराव अवघडे, महेश माने, महेंद्र कुंभार,किशोर देवकर, रामभाऊ खाडे, संतराम पवार, दत्तात्रय कोळी, विक्रम माने, दत्ता गलांडे यासह संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.