Lok Sabha Election 2024 | Crime – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. १० राज्यांतील ९६ जागांसाठी हे मतदान होणार असून एकूण १७१० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील ३६० जणांवर विविध गुन्हे दाखल असून पाच उमेदवारांवर तर बलात्काराच्या गंभीर अणि घृणास्पद गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती उघड झाली आहे.
निवडणुकांच्या सुधारणेच्या संदर्भात काम करणारी बिगर सरकारी संस्था असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म अर्थात एडिआरने उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्याद्वारे ही माहिती मिळवली आहे. चौथ्या टप्प्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, प. बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि जम्मू काश्मीर या राज्यांत मतदान होणार आहे.
एकूण १७१० उमेदवारांपैकी १५४० पुरूष आणि १७० महिला उमेदवार रिंगणात आहेत. तेलंगणातील ८५ उमेदवारांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आंध्र प्रदेशात ६९, महाराष्ट्रात ५३, उत्तर प्रदेशात ३० अशी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या आहे.
मतदान होत असलेल्या ९६ जागांपैकी ५८ टक्के जागा या संवेदनशील क्षेत्रातील आहेत.
या टप्प्यातील १७ उमेदवार असे आहेत की त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ११ जणांवर हत्येचे गुन्हे तर ३० जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. ५० जणांच्या विरोधात महिलांच्या विरोधातील अत्याचाराचे गुन्हे आहेत तर पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
१७१० उमेदवारांपैकी २६ जण निरक्षर आहेत. सुशिक्षित उमेदवारांची संख्या ३० आहे. ६९ जण पाचवी पास, ९३ जण आठवी पास, २३४ जण दहावी पास तर २४८ जण बारावी पास आहेत. ३४८ जण पदवीधर आहेत. ३५६ जणांनी पदव्युत्तर पदव घेतली आहे तर ४५ जणांनी डॉक्टरेट आणि ६६ जणांनी डिप्लोमा केला आहे. १९५ जणांनी व्यावसायिक पदवी घेतली आहे.