चंदीगड – पंजाबमध्ये भाजपला मोठा झटका देताना पक्षाचे ज्येष्ठ नेते राज कुमार वेरका यांनी शुक्रवारी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते “घर वापसी” करत कॉंग्रेसमध्ये सामील होणार आहेत.
वेरका यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सुनील जाखड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक कॉंग्रेस नेत्यांमध्ये वेरका यांचा समावेश होता.
पक्ष सोडण्याचे नेमके कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. वेरका म्हणाले की कॉंग्रेस पक्षाच्या हातात देश सुरक्षित राहू शकतो हे संपूर्ण देश पाहत आहे आणि कोणताही पक्ष सर्व वर्गांना, सर्व धर्मांना सोबत घेऊन जाऊ शकतो तर तो कॉंग्रेस आहे.
वेरका, या प्रदेशातील एक प्रमुख दलित नेते आहेत. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत आणि ते मागील सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण आणि अल्पसंख्याक मंत्री होते. वेरका यांनी दोन वेळा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्षही म्हणून काम पाहिले होते.