नवी दिल्ली – युएपीए म्हणजेच दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि पोर्टलचे मानव संसाधन विभाग प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या अटकेत आणि त्यानंतरच्या पोलीस कोठडीत हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
या पोलिसांच्या कारवाईला आव्हान देणारी त्यांची याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती तुषार राव गेडेला म्हणाले, न्यायालयाला दोन्ही याचिकांमध्ये योग्यता आढळत नाही.
पुरकायस्थ आणि चक्रवर्ती यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 3 ऑक्टोबरला अटक केली आहे. चीन समर्थक प्रचारासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपाखाली त्यांच्यावर कठोर असा युएपीए कायदा लावण्यात आला आहे.
भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी आणि देशाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी या न्युज पोर्टलला चीनकडून मोठ्या प्रमाणात निधी आला होता असे सरकारचे म्हणणे आहे.