नवी दिल्ली: देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यातच गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना सध्या घरातच विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे जनसंपर्क प्रमुख प्रथेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे. इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली.
शंकरसिंह वाघेला यांना गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. ज्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली आहे. ज्यानंतर त्यांना त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी गृह विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
करोनाच्या इतर लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे वाघेला यांच्यात दिसत नाहीत. त्यांना ताप येतो आहे एवढंच एकच लक्षण त्यांच्यात दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण असलेल्या अनेक रुग्णालयांना त्यांनी भेट दिली. त्यातून कदाचित त्यांना करोनाची लागण झाली असावी असेही पटेल यांनी म्हटले आहे. करोना रुग्ण असलेली रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर्स या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. कदाचित त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.