नगर -जिल्ह्यासह नगर शहर व लगतच्या पर्यटनस्थळांचा विकास व त्यातून नगर पर्यटनाला चालना देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई येथे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पर्यटनस्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार जगताप यांनी आग्रही भूमिका मांडत निधीची मागणी केली आहे. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार किरण लहामटे, जुन्नरचे आमदार अमित बेनके आदी उपस्थित होते.
शहर व लगतच्या परिसरात भुईकोट किल्ला, चॉंदबिबी महल, फराहबक्ष महाल, भिस्तबाग महाल, टॅंक म्युझिअम, अवतार मेहेरबाबा यांचे समाधीस्थळ आदी पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास नगरच्या पर्यटनाला चालना मिळू शकेल.
यासाठी सुरुवातीला प्रशासनामार्फत या पर्यटनस्थळांचे सर्वेक्षण होऊन आराखडा तयार होणे आवश्यक आहे. या संदर्भात बैठकीत भूमिका मांडून निधीची मागणी करण्यात आली असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. याबाबत मंत्री तटकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.