नवी दिल्ली – बिहारमधील विधानसभेच्या निवडणूकांसाठी कॉंग्रेसच्या 21 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली. बिहारमधील कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते सदानंद सिंह यांचे पुत्र शुभानंद मुखर्जी यांना कहालगाव विधानसभा मतदारसंघातून संधी देण्यात अली अहे.
याशिवाय गया येथून विद्यमान आमदार मोहन श्रीवास्तव यांच्याऐवजी अखौरी ओंकार नाथ यांना तिकीट देण्यात आले आहे. मोहन श्रीवास्तव यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्यामुळे श्रीवास्तव यांच्या नावाला काही ज्येष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर यंदाच्या निवडणूकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या मध्यवर्ती निवडणूक कमिटीच्या या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीमध्ये मंजूरी मिळाल्यानंतर आज ही यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी 28 ऑक्टोबरला मतदान होणार असून या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. बिहारमध्ये राजद बरोबरच्या आघाडीमध्ये कॉंग्रेस 70 जागांवर निवडणूक लढवित आहे.