रिओ द जानेरिओ (ब्राझील) – लॅटीन अमेरिकेतील ब्राझील हा देश अद्यापही करोना व्हायरसशी झुंजत असल्यामुळे शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच जगप्रसिद्ध कार्निव्हल रद्द करण्यात आला आहे. पुढील वर्षी 2021 मध्ये हा कार्निव्हल होणार होता.
चालू वर्षाचा कार्निव्हल 26 फेब्रुवारी 2020 रोजी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ब्राझीलमध्ये करोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर आतापर्यंत ब्राझीलमध्ये आतापर्यंत 55 लाख 19 हजार 528 करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक लाख 59 हजार 562 जणांचा मृत्यू झाला तर 49 लाख 66 हजार 264 जण बरे झाले. आजच्या घडीला त्या देशात 3 लाख 93 हजार 702 रुग्ण आहेत आणि त्यातील 8 हजार 318 जणांची प्रकृती गंभीर आहे. करोनामुळे अमेरिकेखालोखाल ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत.
दरवर्षी रिओमध्ये होणाऱ्या कार्निव्हल मिरवणूक पाहण्यासाठी सुमारे 90 हजार लोक गर्दी करतात. पुढील कार्निव्हल हा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला असल्याचे रिओतील सांबा स्कूल्स महासंघाच्या अध्यक्षांनी जाहीर केले आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये तरी ही पारंपारिक मिरवणूक निघणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मुख्य म्हणजे कार्निव्हल या इथल्या परंपरेचा भाग असण्याबरोबरच त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
या निमित्ताने शहरभर रस्त्यांवर होणाऱ्या पार्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. यानंतर खात्रीशीर लस येण्यावरच कार्निव्हल कधी होणार ते अवलंबून असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता पाळून कार्निव्हल आयोजित करण्याचा दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नसल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे.