नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) क्रिकेटचे सामने दिवसेंदिवस महिलांमध्ये लोकप्रिय होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच यंदा आयपीएलच्या सामन्यांदरम्यान दाखवण्यात आलेल्या बहुतांश जाहिराती या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या आढळतात.
यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या आठवड्यातील एकूण दर्शकांचा विचार केला तर त्यामध्ये 43 टक्के महिला दर्शक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच महिलांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 57 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
टॅम मिडिया रिसर्च संस्थेकडील आकडेवारीवरून ही बाब पुढे आलेली आहे. आयपीएल सामन्यांच्या दरम्यान वॉशिंग पावडर, टॉयलेट आणि फ्लोअर क्लीनर्स आणि ब्रँडेड ज्वेलरी या वर्गवारीतील जाहिराती प्रामुख्याने झळकत आहेत.
आयपीएलच्या या हंगामात रेकिट बेन्कायझर, हिंदुस्तान युनिलिव्हर, प्रॉक्टर अँड गॅम्बल होम प्रॉडक्टस्, आयटीसी, बॉश होम अप्लायन्सेस हे टॉपचे सहा जाहिरातदार आहेत. वॉशिंग लिक्विड आणि पावडरच्या जाहिराती चारपट तर डिशवॉशरच्या जाहिरातील दुप्पट दिसत आहेत. यंदा प्रथमच नाईन हा सॅनिटरी नॅपकीनचा ब्रँड राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंच्या जर्सीवर ठळकपणे झळकताना दिसतो आहे. त्याचबरोबर फेना डिटर्जंट किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रमुख स्पॉन्सर्सपैकी एक आहे.
यंदा प्रथमच सणासुदीचे दिवस आणि आयपीएल एकाचवेळी आलेले आहेत. त्यामुळे यंदा आयपीएलचा फायदा अनेक ब्रँडसना होताना दिसतो आहे. एरवी आयपीएल उन्हाळ्याच्या दिवसात खेळवले जाते.