पिंपरी – नवरात्रीच्या उत्सवामुळे फुलांना बहर आला असून मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच बरोबर दरही वाढले आहे. मावळ व पिंपरी चिंचवडच्या उपनगरांतून फुलांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात मावळ परिसरातून तिळाची फुले विक्रीसाठी येत असून किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपयांना वाट्याने ही फुले विकली जात आहेत.
गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या पितृपक्षात फुलांना मागणी घटली होती. तर, नवरात्रीचा उत्सव सुरू होताच फुलांना मागणी वाढली आहे. नवरात्रीनंतर येणाऱ्या दसऱ्याच्या सणाला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या मावळ, मुळशी आणि पिंपरी चिंचवड शहरातील उपनगरांमधील शेते फुलांना बहरलेली दिसत आहेत. त्यासह जिल्ह्यातूनही फुलांची आवक सुरू झाली आहे.
त्यामुळे फुलांचे दरही काहीसे वाढलेले आहेत. नवरात्रीला अेकजण कापरी आणि तिळाच्या फुलांचा वापर करतात. तसेच गृह सजावट व देवासाठी झेंडू, अस्टर, शेवंतीच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे फुले बाजारात विक्रीसाठी आलेली आहेत.
खरेदीचा उत्साह
15 दिवस काहीशी मरगळ आलेला फुलबाजार पुन्हा बहरला आहे. बाजारात नागरिकांचा राबता वाढला असून विविध फुलांची खरेदी होत आहे. घटासाठी प्रामुख्याने तिळाच्या फुलांना मागणी आहे. मावळ परिसरातून तिळांच्या फुलांची आवक होत असून ही फुले किरकोळमध्ये 10 ते 20 रुपयांना वाटा या प्रमाणे विकली जात आहेत. तसेच पुजेसाठी झेंडू, शेवंती, अस्टर, तुकडा गुलाब या फुलांनाही मागणी वाढली आहे.