पुणे – शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी खोदाई करण्यासाठी महापालिकेकडून महावितरणला आकारण्यात येणाऱ्या दरात वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील इतर निमशासकीय तसेच शासकीय संस्थांना महापालिका खोदाई शुल्कात 50 टक्के सवलत देते. त्याच वेळी महावितरणला मात्र, जवळपास 80 टक्के सवलत होती. त्यामुळे ही सवलत कमी केली जाणार महावितरणला आता अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे.
दरम्यान, महावितरणच्या आडून खोदाई परवानगी घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनाही या दरवाढीमुळे आळा बसणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे. दरम्यान महापालिकेच्या स्थायी समितीपुढे गेल्या दोन वर्षांपासून शुल्कवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असताना त्याकडे मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
महावितरणलाच सर्वाधिक सवलत
खासगी मोबाईल कंपन्यांसह, महावितरण, एमएनजीएल, बीएसएनएलकडून शहरात सेवा वाहिन्यांसाठी रस्ते खोदाई केली जाते. काही वर्षांपूर्वी ही रस्ते खोदाई केल्यानंतर त्याची दुरुस्ती याच संस्था करत असत. मात्र, हे दुरुस्तीचे काम निकृष्ट होत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असत. त्यामुळे, खोदाईनंतर महापालिकाच रस्ते दुरुस्त करत असून त्याचा खर्च प्रती रनिंग मीटरनुसार आकारला जातो.
महापालिकेकडून हे दर प्रति रनिंग मीटर 12 हजार 192 रुपये दर निश्चित केला आहे. तर, महावितरण वगळता इतर शासकीय संस्थांना 6 हजार 096 असून केवळ महावितरणला 2 हजार 350 रुपये होता. त्यामुळे शहरात केवळ महावितरणलाच सर्वाधिक सवलत दिली जाते.
दरम्यान, महावितरणला खोदाईचे कमी शुल्क असल्याने शहरात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी कराव्या लागणाऱ्या खोदाई शुल्कात सवलत मिळवली आहे. खासगी व्यक्तीस 1 रनिंग मीटरसाठी 12 हजारांचे शुल्क मोजावे लागते. महावितरणला ते केवळ सव्व्वा दोन हजार रुपये आहे.
असे आहे खोदाई शुल्क
- खासगी व्यक्ती, कंपन्या
12 हजार 192 रुपये - शासकीय, निमशासकीय कंपन्या
6 हजार 96 रुपये - महावितरण
2 हजार 350 रुपये