भाजप शहराध्यक्षपदी पहिल्यांदाच “स्त्री शक्‍ती’

सरचिटणीसपद देत गणेश बिडकर यांचेही पुनर्वसन


योगेश गोगावले यांना बापटांची नाराजी भोवली?

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने शहर कार्यकारिणीत फेरबदल करत शहराध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ, तर सरचिटणीसपदी गणेश बिडकर यांची नेमणूक केली. मावळते शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात प्रदेश पातळीवर अनेक मोठे बदल होणार असल्याचे संकेत पूर्वीच मिळाले होते, त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्षपदी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. यानंतर शहरात खांदेपालट होण्याचे संकेत मिळाले होते. लोकसभेवेळी गोगावले यांनी उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गिरीश बापट यांची थेट नाराजी त्यांनी ओढावून घेतली होती. यामुळे त्यांची गच्छंती होणार असल्याचे निश्‍चित झाले होते. पण, हा निर्णय कधी होणार हे मात्र ठरले नव्हते. सोमवारी सायंकाळी भाजप प्रदेश कार्यालयाने फेरबदल करत गोगावले यांना प्रदेश उपाध्यक्ष केले. मुदत संपल्याने ही निवड झाल्याचे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात गोगावले यांना बापट यांच्या नाराजीबरोबर आमदार व नगरसेवक यांनी केलेल्या तक्रारींचा फटका बसला आहे.

दरम्यान, आमदार माधुरी मिसाळ यांच्या रुपाने भाजपने पहिल्यांदाच शहराध्यक्षपदी महिलेची नेमणूक केली आहे. मिसाळ या गेले दोन टर्म पर्वती मतदारसंघातून आमदार आहेत. आताचे फेरबदल आणि निवडणुका लक्षात घेता, मिसाळ यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर गणेश बिडकर यांचे पाटील यांनी पुनर्वसन केले आहे. महापालिकेत सतत सक्रिय असणाऱ्या बिडकर यांना पालिका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यावर ते शहरातील राजकारणातून थोडे दूर झाले होते. लोकसभा निवडणुकीत बिडकर यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. त्याचे फळच पक्षाने बिडकर यांना सरचिटणीसपद देऊन केले आहे.

प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुभाष भामरे
शिवसेनेच्या दबावामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलेले किरीट सोमय्या यांचे पुनर्वसन केले आहे. सोमय्या यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, योगेश गोगावले, अशोक कांडलकर यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश मुख्य प्रवक्‍तेपदाची जबाबदारी माधव भांडारी यांच्याकडे कायम असून राज्यातील माध्यमांच्या संपर्कप्रमुखपदाच्या जबाबदारीसह केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्‍ता म्हणून नेमणूक केली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बदल केले आहेत.

भाजप प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर, तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली आहे. जालना जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्षपदी गिरीश पालवे व यवतमाळ जिल्हाध्यक्षपदावर नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रवक्तेपदी मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरीष बोराळकर, विश्‍वास पाठक, अतुल शहा, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्‍वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याचा नक्‍कीच आनंद आहे. मी आजवर समाज आणि पक्षासाठी केलेल्या कामाची दखल पुन्हा एकदा घेतली गेली. लोकप्रतिनिधीबरोबरच एक संघटक म्हणून मी ही नवी जबाबदारी पेलू शकेल, असा विश्‍वास यावेळी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखविला. पुढील काळात लोकप्रतिनिधी आणि पक्षसंघटक म्हणून मी पूर्णक्षमतेने कार्यरत असेल.
– आमदार माधुरी मिसाळ, नवनियुक्‍त शहराध्यक्ष, भाजप

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×