सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पाच जणांचा करोना रिपोर्ट रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ५२१ वर पोहचली आहे.
रविवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील १ (६० वर्षीय पुरुष), वाई तालुक्यातील वोव्हाळी येथील १ (४२ वर्षीय पुरुष) व जांभळी येथील १ (११ वर्षीय मुलगी), महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील १ (१० वर्षीय मुलगी) व हरचंदी येथील १ (६३ वर्षीय पुरुष) असे एकूण ५ रुग्णांचा रिपोर्ट करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील ५७ वर्षीय पुरुष, पाथरवाडी (ता. कराड) येथील ३३ वर्षीय पुरुष व सातारा शहरातील बुधवार पेठेतील ६५ वर्षीय महिला, अंबेदरे आसरे (ता. वाई) येथील ४३ वर्षीय महिला तसेच उंब्रज (ता.कराड) येथील ६० वर्षीय पुरुष अशा एकूण ५ जणांचा मृत्युपश्चात घेतलेल्या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा रांजणी (ता. जावली) येथून घेऊन आलेल्या ८५ वर्षीय मृत महिलेचा मृत्युपश्चात नमुना तपासणीकरिता पुणे येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
२३७ जण निगेटिव्ह
रविवारी रात्री उशिरा पुण्यातील एन.सी.सी.एस. पुणे यांनी २२८ जणांचे व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी ९ जणांचे असे एकूण २३७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
१४ जण विलगीकरण कक्षात
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात १४ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. यांच्याकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आत्तापर्यंत जिल्ह्यात ५२१ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १६० रुग्ण बरे झाले आहेत. तर ३४० रुग्णांवर उपचार सुरु असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे.