पिंपरी -“करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच उपचारासाठी रावेत येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचे योगदान दिले.
“करोना’चा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती, संस्था आदी घटक पुढे येत आहेत. रावेत प्रभागाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 साठी पाच लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
सदर निधी रावेत येथील आयसीआयसीआय बॅंकेतून धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात आला. करोना संकटाच्या या कठीण समयी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
“करोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे. या महामारीला रोखण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने निधी देऊन योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. “करोना’सोबतच्या या युद्धात जिंकण्यासाठी माझ्या वतीने खारीचा वाटा उचलण्याचा मी प्रयत्न केला आहे.
– मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस