आधी आमचे पुनर्वसन करावे मगच जाग खाली करु

पिंपळे गुरव : पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे दापोडीतील मनपा शाळा ते बोपोडी पुल यामधील 30मिटर नियोजित रस्ता रुंदीकरणासाठी जागा संपादीत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रस्ता रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या घरांना पालिकेच्या वतीने सदर जागा 9 तारखे पर्यंत खाली करुन दयाव्यात, अशा नोटीसा देण्यात आल्या आहेत.

कायद्यानुसार रस्ता असो की, अन्य कोणताही प्रकल्प, तो राबविण्याआधी बाधीत लोकांचे योग्य असे पुनर्वसन झाल्याशिवाय जागा संपादीत करता येत नाही. असा नियम असुन देखिल दापोडीतील बाधीत नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन न करता नागरिकांना बेघर करण्याचा घाट पालिका घालत आहे. असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

येथील नागरिकांनी माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे व रहिवाशी संघर्ष कृती समिती दापोडीने याविषयात लक्ष्य घालुन न्याय द्यावा अशी विनंती केली आहे. त्यानुसार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात बाधीत लोकवस्तीच्या ठिकाणी बैठक घेण्यात आली. आमचा प्रकल्पाला विरोध नाही पण योग्य असे पुनर्वसन झाल्याशिवाय जागा खाली करुन देणार नाही अशी मागणी बाधीत नागरिकांनी यावेळी समिती समोर बोलुन दाखविली.
याप्रसंगी समिती अध्यक्ष विनय शिंदे, रविंद्र कांबळे, समिती सदस्य दिपक साळवे, नागेंद्र सोरटे, अजय पाटील ,नवनाथ डांगे आदि उपस्थित होते.

दरम्यान प्रकल्प बाधितांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यापूर्वी कुणालाही जागा सोडावी लागणार नसल्याचे स्थानिक नगरसेवकांकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.