पुणे: आयुष्य बरबाद केले, म्हणत रात्री झोपेतच गळा चिरून वडिलांचा खून करणाऱ्या अभियंत्या मुलाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी हा आदेश दिला आहे.
प्रदीपकुमार एम. मुरूगन (वय 30, रा. पिंपळे गुरव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने वडील मुरूगन यांचा खून केला होता. याबाबत अनिरय्या स्वामी (वय 57, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार आणि विजय फरगडे यांनी काम पाहिले.
पवार यांनी सात साक्षीदार तपासले. ही घटना 16 एप्रिल 2014 रोजी घडली होती. प्रदीपकुमार हा हिंजवडी येथे एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. हे कुटुंब मूळचे तामिळनाडू येथील आहे. तो आणि वडील दोघेच घरात राहत होते. त्याने चाकुने वार करून वडिलांचा खून केला. या प्रकरणात सांगवी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तीवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी ऍड. पवार यांनी केली.