वर्धन ऍग्रो कारखान्याची २६०० रुपये पहिली उचल

वर्धन ऍग्रो कारखान्याची 2600 रुपये पहिली उचल
धैर्यशील कदम : दुसरा हप्ताही देण्याची ग्वाही

पुसेसावळी  – वर्धन ऍग्रो साखर कारखान्याने 2600 रुपये पहिली उचल देवून दराबाबत दिलेला शब्द खरा करून दाखवला असून शेतकऱ्यांना दुसराही हप्ता शंभर टक्के देणार असल्याची ग्वाही वर्धन ऍग्रोचे संस्थापक चेअरमन धैर्यशील कदम यांनी दिली.

वर्धन ऍग्रोच्या गाळप हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. संचालक हिंदुराव चव्हाण, संपत माने, भीमराव पाटील, सागर शिवदास, सुदाम दीक्षित, चंद्रकांत मदने, भीमराव डांगे, पृथ्वीराज निकम, विक्रमशील कदम, सत्वशील कदम, यशवंत चव्हाण, अविनाश साळुंखे, दत्तात्रय साळुंखे, सतीश सोलापूरे, दीपक लिमकर, सहदेव माने, प्रविण भोसले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कदम म्हणाले, यंदा एक लाख पंचवीस हजार मेट्रीक टनाचे गाळप केले आहे. पुढील वर्षी अडीच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यंदा परदेशातून मागणी असलेल्या जॅगेरी पावडरचे दहा हजार टन विक्रमी उत्पादन कारखान्याने केले आहे. साडेचार हजार मेट्रीक टन साखर उत्पादन, अडीच हजार टन मोलॅसिसचे आणि सात हजार टन बगॅस उत्पादन घेण्यात आले आहे. पुढील वर्षी डिस्टिलरीचे काम हाती घेणार आहोत. तसेच यावर्षी 11.70टक्के साखरेचा उतारा आला आहे. पुढील वर्षी 12.70 टक्केपर्यंत उतारा नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

कारखान्यातील कामगार, शेतकरी ऊस उत्पादकांनी एक कुटुंब म्हणून याकारखान्याकडे पहावे, कारखान्यातील सर्व विभागातील अधिकारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपणासह संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्यास सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी, वाहतूकदार, कंत्राटदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी केले. सूत्रसंचालन रणजित चव्हाण, अनिल यादव यांनी केले. सत्वशील कदम यांनी आभार मानले.

शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याने सर्वाधिक दर देवून शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे. पुढील वर्षीदेखील सर्वांच्या बरोबरीने दर देण्यात येणार आहे.

धैर्यशील कदम, चेअरमन वर्धन ऍग्रो

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.