श्रीरंग बारणेंच्या “भाजप भेटीला’ पदाधिकाऱ्यांचा ठेंगा

मावळमध्ये भाजपचा डमी उमेदवार?

दरम्यान, मावळ मतदारसंघात शहर भाजपकडून डमी उमेदवार दिला जाण्याची शक्‍यता आहे. हा उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गिरीश महाजन, संजय राऊत, नीलम गोऱ्हे, गिरीश बापट आदी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करूनही शहरातील वाद संपुष्टात आलेला नाही. आता शहर भाजपमध्ये डमी उमेदवाराची अंतर्गत चर्चा रंगल्याने खरंच डमी उमेदवार दिला जाणार का? याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी – महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची शनिवारी हिंदू नववर्षाचा मुहूर्त साधून भाजपचे शहर कार्यालय गाठले, मात्र या भेटीला भाजप पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ठेंगा दाखविला. यावेळी केवळ दोघा-चौघांची उपस्थिती हा संपूर्ण शहरभर चर्चेचा विषय बनला आहे.

संपूर्ण राज्यभर शिवसेना-भाजपधील वाद मिटविण्यात नेत्यांना यश आले असले, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील युतीमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचेच पाहवयास मिळत आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी एक पाऊल नव्हे, तर चार पावले मागे घेतली तरी भाजप पदाधिकारी काही एकत्र यायला तयार नाहीत. शनिवारी पुन्हा एकदा बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत खराळवाडी येथील भाजपचे पक्ष कार्यालय गाठले. ही सदिच्छा भेट नियोजित होती. मात्र, या नियोजित भेटीला भाजप कार्यकर्त्यांनी ठेंगा दाखविल्याचे दिसून आले.

महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सत्ता केंद्र भाजपच्या ताब्यात आहेत. प्राधिकरणासह, महापालिकेत शेकडो पदाधिकारी भाजपचे असताना बारणे यांच्या भेटीदरम्यान केवळ चार पदाधिकारी उपस्थित होते. ते देखील पक्षातून अडगळीत पडलेले. सरचिटणीस प्रमोद निसळ, स्वीकृत नगरसेवक मोरेश्‍वर शेडगे यांच्यासह रामकृष्ण राणे व संजय परळीकर याच पदाधिकाऱ्यांची पक्ष कार्यालयात उपस्थिती होती. त्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद विकोपालाच गेल्याचे पुन्हा एका स्पष्ट झाले आहे.

उमेदवार बदलावर भाजप पदाधिकारी ठाम वरकरणी शिरुर मतदारसंघातील शिवसेना-भाजपमधील वाद संपुष्टात आल्याचे दिसत असले, तरी अंतर्गत कलह मात्र अद्यापही कायम आहे. मात्र, युतीची सर्वाधिक वाईट अवस्था ही मावळ मतदारसंघात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप पदाधिकारी अद्यापही श्रीरंग बारणे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे शनिवारी सांगण्यात आले. “उमेदवार बदलला, तरच प्रचार’ अशी ताठर भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.