शेतात मळी टाकणे बेकायदेशीर

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होऊ शकते कारवाई

वाई – शेतकऱ्यांनी शेतामध्ये टाकलेल्या मळीमुळे जमिनीतील पाण्याचे प्रवाह दूषित होत असून विहीरी, ओढे, तळ्यातील पाणी प्रदूषित होत आहे. शेतात मळी टाकणे बेकायदेशीर असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अशा शेतकऱ्यांवर व कारखान्यावर कारवाई होवू शकते.

सध्या शेतकऱ्यांची शिवारातील कामे आटोपली असून शेतजमिनी मोकळ्या झाल्या आहेत. अशावेळी शेतकरी साखर कारखान्याकडून टॅंकरने मळी घेवून मोकळ्या शेतात टाकत आहेत. या मळीमुळे जमिनीतील पाण्याचे प्रवाह दूषित होतात. त्यामुळे आजूबाजूच्या शेतातील विहीरी, नद्या, ओढे, तळी व इतर पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. या पाण्यातील मासे व इतर जलचर प्राणी यामुळे मृत होत आहेत. अशा विहिरी व इतर ठिकाणचे पाणी मनुष्य, जनावरे व प्राणीमात्रांसाठी पिण्यायोग्य राहत नाही. याचबरोबर दुर्गंधीचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागतो. या दुर्गंधीमुळे डास व माशांचाही प्रार्दुभाव वाढतो. यातून अनेक आजारांना आपोआपच निमंत्रण मिळते.

दुष्काळामुळे अगोदरच जमिनीतील पिण्याच्या पाण्याचे साठे कमी झाले आहेत. कित्येक गावांना पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून रहावे लागत आहे. गावेच्या गावे स्थलांतरीत होत आहेत. सरकारला ठिकठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या लागतात. दरवर्षी कोटयावधी रुपये दुष्काळ निवारणासाठी खर्च केले जातात. शेतकऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखून असलेले पाण्याचे स्त्रोत जपणे गरजेचे आहे. थोड्याशा फायद्याच्या अमिषाला बळी न पडता शेतकऱ्यांनी दुरदृष्टीने विचार करून शेतामध्ये मळी टाकू नये.

साखर कारखानेही मळीसारखे दुषित विषारी पाणी फिल्टर करण्याऐवजी खर्चात बचत होते म्हणून शेतकरी सभासदांना बेकायदेशीरपणे शेतात टाकण्यासाठी देतात. शेतात मळी टाकणारे शेतकरी व कारखान्याविरुध्द कोणी तक्रार करण्यासाठी धजावत नाही. मात्र एखाद्या सुजाण नागरिकाने प्रदुषण नियंत्रक मंडळ व पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केल्यास त्यांची दखल घेतली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या शेतामध्ये मळी टाकू नये, अशी मागणी सध्या शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. जागरुक व सुजाण नागरिकांनी याबाबत तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. एका सुजाण शेतकऱ्याने याबाबत उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सातारा यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता वरील सर्व माहिती उपलब्ध झाली असल्याचे सदर शेतकऱ्याने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.