जेजुरी -कुमारवयात होणारे आकर्षण त्यातून निर्माण होणारी प्रेम प्रकरणे हा पालकांच्या काळजीचा विषय बनला आहे. अपरिपक्व वयामध्ये घडणाऱ्या चुका भावी आयुष्यात घातक ठरू शकतात. यासाठी प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखा. कुमारवयीन मुला-मुलींचे शिक्षण यांसारख्या विषयावर कार्यशाळांची गरज आहे, असे विचार सामाजिक कार्यकर्त्या शशिकला कोलते यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरीच्या मानसशास्त्र विभागाच्या संयुक्त वतीने कार्यशाळा एसी हुंडेकरी कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा चाफळकर यांनी सुज्ञ, शहाणा आणि परिपक्व असा महाविद्यालयीन युवक निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले. उमलत्या वयामध्ये ग्रंथी संस्था विकसित होत असतात. त्यामुळे मनोशारिरीक गोंधळाची स्थिती निर्माण होते.
अनेक बदलांना मन व शरीर सामोरे जाते. यावेळी योग्य-अयोग्यतेची जाणीव निर्माण होण्यासाठी कार्यशाळा घेण्याचा उद्देश आहे, असे प्रास्ताविकामध्ये प्राध्यापिका किशोरी ताकवले यांनी सांगितले.
मासूम संस्थेचे योगेश धेंडे यांनी आपल्या व्याख्यानात मुलांच्या अनुत्तरित प्रश्नांना उत्तरे दिली. गर्भधारणा, मुलांच्या शरीराची वाढ, विकास, वाईट सवयी, विचार, व्यसन, प्रेम आणि लैंगिक शिक्षण इत्यादी विषयावर सखोल चर्चा केली. मुलींशी संवाद साधताना मासूमच्या मंगल मगर यांनी यावेळी स्त्रीच्या शरिराची माहिती, ओळख, सुआरोग्य, काळजी आणि आजार याविषयी ची माहिती दिली. या कार्यशाळेसाठी एसी हुंडेकरी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य इनामदार प्रा. धनंजय वाबळे यांनी विचार व्यक्त केले. प्रा. कांचन दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले प्रा. कल्पना रोकडे यांनी आभार व्यक्त केले.