संकेतस्थळावर पर्याय नाही : अधिकारीही नाही
पिंपरी – कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या कामांच्या माहितीबाबत स्मार्ट सिटीअंतर्गत हा पर्याय नागरिकांसाठी नसल्याचे समोर आले आहे. तसेच स्मार्ट सिटी कंपनीकरिता माहिती अधिकारी नेमलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी माहिती कोणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता असावी, तसेच नागरिकांना माहिती उपलब्ध व्हावी यासाठी माहितीचा अधिकार कायदा करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच शासन व यंत्रणेला जाब विचारण्यासाठी माहितीचा अधिकार महत्त्वाचा आहे. या अधिकारामुळे नागरिकांना माहिती सहज उपलब्ध होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत देशातील शंभर शहरे विकसित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचाही समावेश आहे. पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, मैलापाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने यामध्ये केले जाते. माहिती तंत्रज्ञानातील उत्तम सुविधा त्यामध्ये दिल्या जातात.
स्मार्ट शहरासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यामध्ये स्मार्ट शहर विकासासाठी करार केला जातो. तसाच करार पिंपरी चिंचवड महापालिका व राज्य सरकार यांच्यामध्ये केला आहे. मात्र शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती मिळविण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेली नाही. स्मार्ट सिटी संकेतस्थळावर माहितीचा अधिकार कायदा 2005 चा पर्याय नागरिकांना देण्यात आला नाही. तसेच या कंपनीसाठी माहितीचा अधिकार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नागरिकांना माहिती मिळण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. शासनाच्या निधीतून म्हणजेच करदात्याच्या पैशातून स्थापन झालेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाची सर्व माहिती, माहिती अधिकार कायदा 2005 नुसार सर्वांना उपलब्ध करून द्यावी. तसेच माहिती अधिकारी नेमून माहितीचा अधिकार कायदा 2005 ची अमंलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. या बाबीची तात्काळ दखल नाही घेतली तर शिवसेना पद्धतीने आम्ही आंदोलन करू.
– योगेश बाबर, शहरप्रमुख, शिवसेना