जिल्हा रुग्णालयात अखेर सीटी स्कॅन सुविधा

डॉ. आमोद गडीकर; अणुऊर्जा नियामक मंडळाने दिली परवानगी

दलालांना हद्दपार करा…
जिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापन कामच करत नाही, अशी ओरड करून आपली पोळी भाजणारे बरेच दलाल येथे सक्रिय आहेत. नेत्यांची नावे सांगून प्रशासनाला दमात घेणारे गावटगेही आहेत. काही महाभाग सिव्हिल आपल्याला हुंड्यात मिळाल्याच्या आविर्भावात असतात. पण प्रत्यक्षात कामाची शिस्त स्वतःला लावून घेताना जवाबदारी टाळून तक्रार करायची, ही गेल्या दहा वर्षाची मानसिकता अजूनही बदललेली नाही. सुविधांमध्ये त्रुटी आहेत हे मान्य, मनुष्यबळ अपुरे हे मान्य पण याचा अर्थ आम्ही कामच करत नाही, असे नाही, अशा प्रतिक्रिया काही कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर खासगीमध्ये दिल्या. येथील दलालांना हद्दपार करा, अशी आर्त हाक रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे. सीटी स्कॅन यंत्रणा सुरू झाल्याने गडीकर यांच्या नावावर आणखी एका भरीव कामाची नोंद झाली आहे .

सातारा – सातारा जिल्हा रुग्णालयाच्या सीटी स्कॅन विभागाला अणुऊर्जा नियामक महामंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी सीटी स्कॅनची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. तोशिबा मेडिकल सिस्टिम कार्पोरेशन जपान कंम्प्युटेड टोमोग्राफी ही यंत्रणा जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वी बसवण्यात आली होती. मात्र, किरणोत्सारितेच्या प्रमाणित उत्सर्जनासाठी अणुऊर्जा नियामक मंडळाची परवानगी आवश्‍यक होती.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांचा महामंडळाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अणुऊर्जा विभागाने परवानगी देणारे लेखी पत्र डॉ. गडीकर यांना 9 जुलै रोजी पाठवले आहे. ही परवानगी केवळ मर्यादित किरणोत्सारिता उत्सर्जनासाठी देण्यात आली आहे. परवानगी पाच वर्षासाठी असून त्याचा कालावधी 9 जुलै 2024 पर्यंत असणार आहे. अणुऊर्जा नियामक महामंडळाने जिल्हा रुग्णालयाच्या सिटी स्कॅन विभागाची तांत्रिक मान्यता अंतिम टप्प्यात असल्याची खूशखबर दिली होती. मात्र, परवानगी मिळाल्याने सीटी स्कॅनची सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सीटी स्कॅन विभागासाठी रेडिओलॉजिस्ट डॉ. माने यांची नेमणूक झाली असून हा विभाग सुरू झाल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. अणुऊर्जा मंडळाच्या अधिकृत मान्यतेशिवाय ही सेवा सुरू करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. गडीकर यांनी गेल्या दहा महिन्यांत पाठपुरावा करून सुसज्ज ऑपरेशन थिएटर, केमोथेरपी विभाग, मनोचिकित्सा विभाग, दंतचिकित्सा या यंत्रणा उभारल्या. तसेच सीटी स्कॅन मशीनच्या पायाभूत सुविधांसह ती सुरू करण्यासाठी यंत्रणा उभारल्या. अवघ्या सहा महिन्यांत वैद्यकीय संचालनालयाकडे पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचे सिटी स्कॅन मशीन जिल्हा रुग्णालयाच्या कक्षात स्थापित करताना किरणोत्सारिता व त्याचे धोके लक्षात घेऊन तीन वेळा आराखडा बदलण्यात आला.

सीटी स्कॅन ही यंत्रणा क्ष किरणाच्या साह्याने मानवी शरीराचे विभिन्न कोनातून छेद चित्र घेते. यामध्ये शरीराच्या रक्तवाहिन्या व शरीराच्या कोणत्याही भागातील बिघाड स्पष्टपणे दिसून येतो. विविध रोगांच्या अचूक निदान व उपचारासाठी ही यंत्रणा प्रभावीपणे वापरली जाते. त्यामुळे सातारा जिल्हा रुग्णालयात ही यंत्रणा असणे आवश्‍यकच होते. ही यंत्रणा सक्रिय होऊनही ती स्वतंत्र कक्षात कुलूपबंद ठेवण्याची हाकाटी सुरू करत काही यंत्रणांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आगपाखड सुरू केली. मात्र, तांत्रिक आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अणुऊर्जा नियामक मंडळाकडून सीटी स्कॅन यंत्रणा प्रमाणित झालेली नव्हती.

प्रस्ताव सादरीकरणाच्या सर्व तपशीलांवर डॉ. गडीकर यांनी स्वाक्षरी करून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. नियामक मंडळाकडून ही प्रक्रिया पूर्ण करताना कक्ष पाहणी व किरणोत्सारिता पातळी तसेच अन्य सुधारीत यंत्रणांचे अद्ययावतीकरण यासह सीटी स्कॅन कक्षाचे विलगीकरण या महत्वाच्या बाबी कटाक्षाने तपासल्या.

त्यानंतर पंचेचाळीस दिवसांत जिल्हा रुग्णालयाला सीटी स्कॅनच्या विभागाला परवानगी मिळाली. रुग्णालय प्रशासनाचे हे मोठे यश मानले जात आहे. सीटी स्कॅन यंत्रणा येत्या आठवडाभरात प्रमाणीकरणाच्या प्रमाणपत्रासह तातडीने सुरू करून त्याचे उदघाटन लवकरच घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.