एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदुम यांची माहिती
मुंबई : एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला महात्मा गांधींच्या विनासंकलित चित्रिकरणाची 30 रीळे सापडली असून, त्यांचा कालावधी सुमारे 6 तासांचा आहे. ही 35 एमएमची रीळ असून, त्या पॅरामाऊंट, वॉर्नर, युनिव्हर्सल, ब्रिटीश मुव्ही टोन, वाडीया मुव्ही टोन यासारख्या तत्कालीन प्रसिद्ध स्टूडिओनी हे चित्रिकरण केले आहे.
एनएफएआयसाठी हा अतिशय छान खजिना असून, संपूर्ण जग महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी करत असतांना हाती लागला आहे. यातील काही दृष्य अतिशय दुर्मिळ असून, इतर दृष्य लघुपट आणि माहितीपटांमध्ये समाविष्ट आहेत, असे एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदुम यांनी म्हटले आहे. यापैकी अर्ध्या तासांचे चित्रिकरण महात्मा गांधींच्या अस्थी मद्रासहून रामेश्वरमला नेणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचे आहे. यामध्ये हजारो लोक तामिळनाडूतल्या रेल्वे स्थानकांवर साश्रु नयनांनी महात्मा गांधींच्या अस्थींना वंदन करत असल्याचे दिसत आहे. महात्मा गांधींना शेवटची मानवंदना देण्यासाठी हातात झेंडे आणि फलक घेतलेला अथांग जनसमुदाय यात दिसत आहे.
या संग्रहामध्ये मणिलाल गांधी यांचे एक दृष्य आहे. महात्मा गांधींचे ते दुसरे सुपुत्र होते आणि “इंडियन ओपिनियन’ या गुजराती, इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक होते. महात्मा गांधींचा मुलगा या शिर्षकाखाली मणिलाल गांधी यांची दृष्य पाहायला मिळतात.
या संग्रहातील काही दृष्यांमध्ये वि.दा.सावरकर, पंडित नेहरु, सरदार पटेल, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद आदी नेत्यांचेही दर्शन घडते. रविंद्रनाथ टागोर यांची महात्मा गांधींनी घेतलेली भेट पाहायला मिळते. महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात झालेल्या शोक सभेचे दृष्यही या संग्रहालयात आहे. ही सर्व रीळ चांगल्या स्थितीत असून, लवकरच त्यांचे डिजिटायझेशन करण्याचा विचार असल्याचे मगदुम यांनी सांगितले.