निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांची माहिती
भोर- भोर विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 59 हजार 868 मतदार असून 529 मतदार केंद्र आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेचे पालन करा, असे आवाहन भोर विधानसभा मंतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अजित पाटील, शिवाजी शिंदे, अभय चव्हाण आदी उपस्थित होते.
जाधव यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी 525 एवढे मतदान केंद्र असून मुळशी तालुक्यात 4 सहाय्यक मतदान कक्ष आहेत. 69 ठिकाणी सुविधा नसल्यामुळे वायरलेस सॅटेलाइट फोन व रनर एसएमएसद्वारे माहिती देण्यास सांगण्यात येणार आहे. दिवस-रात्र 24 तास भरारी पथके व तपासणी पथके कार्यरत राहणार आहेत.
विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान जनजागृती करणे, एक खिडकी, आचारसंहिता कक्ष, टपाली मतदान कक्ष, हिशोब तपासणी व्यवस्थापन कक्ष असणार आहेत. आचारसंहिता कक्षप्रमुख म्हणून भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांची नेमणूक केली आहे.