“करोना’ची भीती : पोलीस निरीक्षकांना बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना
पिंपरी – “करोना’ची भीती दिवसें-दिवस वाढत चालली असून परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर बहिष्कार टाकणे, त्यांना सोसायटी येऊ देण्यास मज्जाव करणे, अशा घटना वाढत आहेत. “करोना’ संशयितावर सोसायट्यांनी बहिष्कार टाकू नये. जर टाकल्यास त्या सोसयटीमधील नागरिकांचे समुपदेशन करावे. तरीही बहिष्कार टाकल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.
परदेशातून आलेल्या नागरिकांना सोसायटीत प्रवेश देऊ नये, अशी मागणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगवी पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी कायद्याच्या भाषेत योग्य ती समज दिल्याने पदाधिकाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत संबंधित कुटुंबियांना सोसायटीत प्रवेश दिला. अशाच प्रकारची आणखी एक घटना बुधवारी इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.
काय घडले भोसरीतील त्या सोसायटीत ?
इंद्रायणीनगर, भोसरी येथे तीन दिवसांपूर्वी दुबईतून एक नागरिक आला होता. त्यास सोसायटीतील नागरिकांनी आक्षेप घेतला. मात्र आपली विमानतळावर तपासणी झाली असल्याचे त्या नागरिकाने सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र त्यावर सोसायटीतील नागरिकांचा विश्वास बसला नाही. बुधवारी दुपारी सोसायटीमधील सदस्यांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास कळविले. एमआयडीसी पोलीस संबंधित सोसायटीत दाखल झाले. वैद्यकीय तपासणी केल्याचे कागदपत्र दाखवा, असा आग्रह सोसायटीमधील रहिवाशांनी कायम ठेवला. अखेर पोलिसांनी याबाबत महापालिकेला कळविले. महापालिकेचे एक पथक घटनास्थळी हजर झाले व त्यांनी संबंधित नागरिकाला तपासणीकरिता रुग्णालयात नेले.