राजगुरूनगर बॅंकेसाठी 56.61 टक्के मतदान : आज निकाल
मतदान केंद्राबाहेर उमेदवार, पोलिसांमध्ये बाचाबाची
राजगुरूनगर : राजगुरुनगर सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी 56.61 टक्के मतदान झाले. 16 जागेसाठी 31 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतमोजणी सोमवारी (दि. 7) राजगुरूनगर येथे होणार आहे.
राजगुरूनगर सहकारी बॅंकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. यासाठी रविवारी (दि. 6) बॅंकेच्या कार्यक्षेत्रात 64 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी बॅंकेच्या 29 हजार 219 सभासदांपैकी 16 हजार 542 सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राजगुरूनगर येथे तब्बल 27 मतदान केंद्रावरील 13 हजार 345 मतदानापैकी 8 हजार 22 मतदारांनी हक्क बजावला. मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. मतदान समयी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही; मात्र मतदान केंद्राबाहेर उमेदवार आणि पोलीस यांच्यात मतदान केंद्राबाहेर उभे राहण्यावरून काहीसा संघर्ष झाला.
राजगुरूनगर केंद्रावर सकाळी अकरा वाजल्यापासून मतदानासाठी सभासद मतदारांची मोठी गर्दी झाली होती. राजगुरूनगरमध्ये सर्वाधिक 27 केंद्र होती. 13 अजार345 मतदार संख्या असल्याने जवळपास सर्वच उमेदवारांनी येथील मतदान केंद्राच्या गेटवर उपस्थिती होते. मतदान करण्यासाठी मतदाराला प्रोत्साहित करण्याची उमेदवारांची मोठी चढाओढ लागली होती. त्यामुळे गेटवर गर्दी झाल्याने मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी कडक भूमिका घेत उमेदवारांना बाजूला केले; मात्र उमेदवारांनी आक्षेप घेत आम्हाला येथे थांबण्याची परवानगी देण्याची मागणी केली. त्यानंतर मात्र यंत्रणांनी काहीसे सैल सोडले. दोन्ही बाजूने उमेदवार व त्यांचे समर्थक उभे राहिल्याने त्यांच्या मधून मतदारांना जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी अडचण झाल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
वाडा रस्त्यावर वाहतूककोंडी
राजगुरूनगरमधील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या केटीईएस, महात्मा गांधी विद्यालय आणि शेठ केशरचंद विद्यालय या एकत्र तीन शाळा असून त्यामध्ये 27 मतदान केंद्रे असल्याने मतदान केंद्राबाहेर वाडा रस्त्यावर उमेदवार त्यांचे समर्थक आणि मतदार यांची मोठी गर्दी झाली. अनेक वाहने ररत्यात लावल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही गर्दीमुळे वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला.
मातब्बरांनी बजावला हक्क
राजगुरुनगर सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सभासद असलेले आमदार दिलीप मोहिते पाटील, त्यांच्या पत्नी सुरेखा मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांच्यासह सर्वच क्षेत्रातील बॅंकेच्या मान्यवर सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.