पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) -पिंपरी ते निगडी या मेट्रोचा सुधारित फेरप्रस्ताव केंद्र शासनाच्या लालफितीच्या कारभारात अडकून पडला आहे. प्रस्तावाची फाईल दीड वर्षापासून धूळखात पडली आहे. मेट्रोच्या चालू कामातच विस्तारित मार्ग तयार होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या मार्गासाठी नागरिकांना आणखी काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच मेट्रोचा मार्ग जोपर्यंत निगडीपर्यंत होत नाही, तोपर्यंत पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गालाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर दापोडी ते निगडी मार्गावर सलग मेट्रो मार्गिका निर्माण केल्यास निगडी ते स्वारगेट मार्गावर नागरिकांच्या दृष्टीने आणि वाहतुकीचा एक मोठा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो करण्याची शहरवासीयांची सुरूवातीपासून मागणी होती. नागरिक व नगरसेवकांच्या आग्रहामुळे महामेट्रोकडून चिंचवडच्या मदर टेरेसा पुलापर्यंत डीपीआर तयार करून घेतला. त्यास 1 हजार 253 कोटी खर्च अपेक्षित होता. या डीपीआरला महापालिकेने 20 डिसेंबर 2018 ला आणि राज्य शासनाने 27 फेब्रुवारी 2019 ला मंजुरी दिली. मोठ्या प्रतीक्षेनंतर केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ऑक्टोबर 2020 ला मंजुरी दिली. मात्र, 20 ऐवजी केवळ 10 टक्के निधी देण्याचे मान्य केले. तो निधी 125 कोटी इतका आहे.
पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोसाठी 1 हजार 48 कोटी 22 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग 4.413 किलोमीटरचा असणार आहे. नवीन मेट्रो रेल 2017 च्या धोरणानुसार फक्त 10 टक्के अनुदान दिले जाणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले. निधीअभावी निगडीपर्यंतच्या मार्गाबाबतची कार्यवाही रखडली. त्यामुळे राज्य शासनाने उर्वरित खर्चाची जबाबदारी 17 फेब्रुवारी 2021 ला उचलली. राज्याने तत्काळ मंजुरी दिल्यानंतर तो केंद्राकडे पाठविला. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सुरू असलेल्या कामासोबत निगडीपर्यंत मेट्रोचे काम करता येत नाही. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतरच नव्याने निविदा काढावी लागणार आणि त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे निगडीपर्यंतच्या मेट्रो सध्या तरी ट्रॅक बाहेरच आहे. पिंपरी ते फुगेवाडी या 5.8 किलोमीटर अंतराच्या मार्गास 6 जानेवारी 2022 ला कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची मान्यता मिळाली. त्यानंतर त्या मार्गावर प्रवासी वाहतूक 6 मार्च 2022 ला सुरु झाली. त्यास आठ महिने झाले तरी निगडीपर्यंतच्या विस्तारीत मार्गास केंद्राने मंजुरी दिलेली नाही.
पिंपरी ते निगडी मेट्रो डीपीआरचा प्रवास
स्थायी समितीची मंजुरी 11 डिसेंबर 2018
महापालिकेची मंजुरी 20 डिसेंबर 2018
राज्य शासनाची मंजुरी- 27 फेब्रुवारी 2019
केंद्र शासनाची मंजुरी-5 ऑक्टोबर 2020
राज्य शासनाने उर्वरित खर्चाची जबाबदारी स्वीकारली 17 फेब्रुवारी 2021
महापालिकेकडून सुधारित प्रस्ताव मंजूर मे 2021
राज्य शासनाने सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली – मे 2021.