शेतकरी आंदोलन : ‘मोदी सरकारने माघार घेऊ नये’

मनसे नेत्याची भूमिका

मुंबई – केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जगभरातून समर्थन देत आहेत. आहे. या कायद्याविरोधात उद्या भारत बंदची हाक देण्यात आली आहे. विविध पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. परंतु, मनसे नेत्यांनी याविरोधात भूमिका घेतली आहे.

शेतकरी आंदोलनावर मनसे नेते अनिल शिदोरे यांनी म्हंटले कि, आपण वर्षानुवर्ष पाहिलं की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बिमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले, आता येथून सरकारनं माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल. सरकारनं माघार घेऊ नये, असे मत त्यांनी मांडले आहे.

तसेच, शेतीचं भलं खुल्या बाजाराशी जोडलं जाण्यात आहे. ती दिशा आहे. ज्या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे, ते कायदे त्याच दिशेनं जाणारे आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील परंतु आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण दहा वर्ष मागे जाऊ, असेही शिदोरे यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्या “लोक माझे सांगाती..” या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढलं पाहिजे असं म्हटलं असल्याचं समजलं. मी पुस्तक वाचलेलं नाही पण हे खरं आहे का? असा प्रश्न अनिल शिदोरे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.