पुणे – रिक्षाचालकाने आई-वडिलांना आळंदी येथे सोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण दोन वेळचे अन्न मिळण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आल्यावर या रिक्षाचालकाला सर्वच बाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालकाला आर्थिक आणि किराणा स्वरूपात मदत केली.
मांजरी येथील रहिवासी शिवाजी कांबळे यांच्या उत्पन्नाचे साधन असणारी ऑटोरिक्षा फायनान्स कंपनीने नेली. हलाखीच्या परिस्थितीमुळे 70 आणि 75 वर्षांच्या आई-वडिलांना आळंदी येथे सोडून निघाले होते; परंतु स्थानिक व्यक्तीने हटकल्यामुळे त्यांना घरी परत नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक कक्षातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीच्या घरी जात परिस्थितीची पाहणी केली. शिवाय संभाजी मित्र मंडळाच्या वतीने किराणा माल आणि अल्प स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली आहे. यासह ज्येष्ठ नागरिकांच्या मुलांना “भरोसा सेल’च्या ज्येष्ठ नागरिक कक्ष येथे बोलावून ज्येष्ठ नागरिक कायद्याची माहिती देत ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्याबाबत समज देत समुपदेशन करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती केदार आणि कर्मचाऱ्यांनी केली.