व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 260 दावे निकाली
पुणे – कौटुंबिक न्यायालय सर्व न्यायालयांसमोर मॉडेल न्यायालय ठरत आहे. येथे दावे निकाली काढण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. 6 जानेवारी 2018 ते जानेवारी 4 मार्च 2020 या कालावधीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुमारे 260 दावे निकाली काढण्यात आलेले आहेत. या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा परदेशातील पक्षकारांना मोठ्या प्रमाणावर होत असून, त्यांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होत आहे.
पुणे राज्यातील प्रथम न्यायालय आहे की, जेथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दावे निकाली काढले जातात. ई कोर्ट प्रकल्पा अंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग न्यायाधीश, कोर्ट कमिशनर आणि समुपदेश यांच्यामार्फत आमलात आणला जातो. कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या मार्गदर्शनाखाली कौटुंबिक न्यायालयात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग एक भाग आहे.
वकील आणि पक्षकारांच्या सोयीसाठी अनेक अद्ययावत तंत्रज्ञान कौटुंबिक न्यायालयामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे. अनेक खटल्यांमध्ये पक्षकार हे देशातील विविध राज्यांत आणि परदेशात वास्तव्यासाठी गेलेले पाहायला मिळतात. त्यांना सुट्टी काढून किंवा भाडे खर्च करून, खटल्याच्या प्रत्येक तारखेला येणे शक्य होत नाही. त्यामुळे या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी संवाद साधून खटला निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वी परदेशात असलेल्या व्यक्तीलाही सुनावणीसाठी देशात यावे, लागत असत. त्यावेळी पैसे खर्च व्हायचे. वेळही जायचा.
कामावरून सुट्टी, व्हिसा मिळायला अनेक अडचणी यायच्या. त्यामुळे खटले लांबायचे. मानसिक त्रास व्हायचा. तंत्रज्ञानामुळे यातून पक्षकारांना सुटका झाली आहे. कौटुंबिक न्यायालयात अधुनिक सुविधेमुळे दावे लवकर सुरू होतात. लवकर संपण्यास मदत होत असल्याचे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशच्या अध्यक्षांनी सांगितले.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे माध्यम प्रभावी
सध्याच्या काळात बदलती जीवनशैली, समजूतदारपणाचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, करिअरला देण्यात येणारे प्राधान्य, एकमेकांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच, एकमेकांना वेळ न देणे, एकमेकांमध्ये होणाऱ्या संभाषणाचा अभाव यासह अन्य कारणांमुळे कौटुंबिक कलहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीतील वाद हा थेट कौटुंबिक न्यायालयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. क्षुल्लक कारणांवरून होणारे वादामध्ये थेट घटस्फोटासारखे निर्णय घेण्यात येत आहेत. दिवसेंदिवस कौटुंबिक न्यायालयामध्ये दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे माध्यम प्रभावी ठरत आहे.