मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवाराचा दौराही रद्द करण्यात आला. त्यामुळे दोघांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, याविषयी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून खंडन करण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणात मंगळवारपासून जाहिरातीवरून वादंग सुरू झाला आहे. शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीत फडणवीसांना दुय्यम स्थान देण्यात आल्याने युतीत नाराजीनाट्य सुरू झाले. त्यामुळे आज पुन्हा शिंदेच्या शिवसेनेकडून सुधारित जाहिरात देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात येणार होते. मात्र अचानक उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. दरम्यान कानाचा त्रास सुरू झाल्याने दौरा रद्द केल्याचा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खुलासा केला असला तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात जाहिराती वरुन बिनसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
त्यात, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत एसटीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला फडणवीस देखील उपस्थिती राहणार होते. मात्र, या कार्यक्रमाला ते हजर राहणार नसल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली.
“डीसीएम’ कार्यालयाकडून खंडन
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयाच्या वतीने या सर्व चर्चांचे खंडन करण्यात आले. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. कानाच्या दुखापतीमुळे विमान व कार प्रवासाला मज्जाव करण्यात आलेला आहे. तसेच बुधवारी सायंकाळी अकोला येथे होणाऱ्या सभेला देखील ते जाणार नाहीत.
प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने फडणवीस अतिथी गृहावर ठराविक बैठका घेणार आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत’, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. यासह फडणवीस यांची गुरुवारी धाराशीव जिल्ह्यात देखील जाहीर सभा होणार होती. परंतू प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी ही सभा देखील रद्द केली आहे.