लक्षद्वीप – लक्षद्वीपमध्ये चित्रपट निर्माता आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने भाजप नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. आयशा सुल्तानाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याने भाजपच्या 15 नेत्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.
लक्षद्वीप भाजप अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर लक्षद्वीपची पहिली महिला फिल्ममेकर आयशा सुल्तानावर शुक्रवारी कावारत्ती पोलीस स्टेशनमध्ये राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका टीव्ही शोमधील चर्चेदरम्यान आयशा सुल्ताना यांनी लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय आणि करोना रुग्णांची वाढती संख्या यावरुन टीका केली होती.
याबाबत भाजपचे राज्य सचिव अब्दुल हामिद यांनी सांगितले की, आपल्या चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्हाला यावर आक्षेप आहे आणि आम्ही आमचा राजीनामा देत आहोत.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप राज्य सचिव अब्दुल हामिद मुल्लीपुरा, वक्फ बोर्डाचे सदस्य उम्मुल कुलूस पुथियापुरा, खादी बोर्डाचे सदस्य सैफुल्ला पक्कियोडा, जाबिर सलीहथ मंजिल आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान भाजप पक्षाच्या 12 नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वाक्षरीचे एक पत्र अब्दुल खादर हाजी यांना पाठवण्यात आले आहे.