मिनिकोय (लक्षद्विप) – लक्षद्विपजवळ असलेल्या मिनिकोय या संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या बेटाजवळ भारतीय नौदलाने आयएनएस जटायू हा नाविक तळ तैनात केला आहे. यामुळे संरक्षण दृष्ट्या महत्वाच्या लक्षद्विप बेटासह सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षणाला उपयोगी परिस्थिती निर्माण होऊ शकेल.
याशिवाय हिंद-प्रशांत महासागरातील चाचेगिरीविरोधी उपाययोजनांसाठी आणि कारवाईसाठी हा नाविक तळ उपयोगी ठरणार आहे. अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागात सागरी मार्गांनी होणारी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठीही या नाविक तळाची उपस्थिती महत्वाची ठरणार आहे.
नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरि कुमार यांच्या उपस्थितीत आयएनएस जटायू मिनिकोय बेटाजवळ तैनात केले गेले. रामायणामध्ये सीतेच्या अपहरणाला सर्वात पहिल्यांदा जटायूने विरोध केला होता. बलिदान करायला लागले, तरी जटायूने रावणाला विरोध केला होता.
त्याचप्रमाणे भारताच्या संरक्षणासाठी सर्वात पहिल्यांदा आयएनएस जटायू प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असेल, असे गौरवोद्गार नौदल प्रमुखांनी यावेळी काढले.
मिनिकॉयचे महत्व…
मिनिकॉय हे लक्षद्वीपचे सर्वात दक्षिणेकडील बेट आहे, हे बेट दळणवळणाच्या महत्त्वाच्या सागरी मार्गावर आहे. मालदीवबरोबर अलिकडच्या काळात निर्माण झालेल्या विसंवादाच्या पार्श्वभुमीवर भारतीय सागरी हद्दींमध्ये चिनी युद्धनौका आणि हेरगिरीच्या नौकांची घुसखोरी रोखणे, हा आयएनएस जटायूच्या नियुक्तीमागील हेतू आहे.