नवी दिल्ली -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटाने लक्षद्विपमधील लोकसभेच्या एकमेव जागेसाठीचा उमेदवार जाहीर केला. त्यानुसार, सामाजिक कार्यकर्ते युसूफ टी.पी.यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
मावळत्या लोकसभेत मोहम्मद फैजल हे लक्षद्विप मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार आहेत. त्या गटाने फैजल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसने याआधीच हमदुल्लाह सईद यांना रिंगणात उतरवले.
आता अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याने लक्षद्विपमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजपने मागील आठवड्यात लक्षद्विपमध्ये अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला. त्या घोषणेची शरद पवार गटाने खिल्ली उडवली होती.
मागील निवडणुकीत (वर्ष २०१९) भाजपला लक्षद्विपमध्ये केवळ १२५ मतं मिळाल्याकडे त्या गटाने लक्ष वेधले होते. लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. लक्षद्विपमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिललाच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.