पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) देखील सज्ज झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड स्थानकांतून राज्यात जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
दिवाळीनिमित्त 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातून कोकण, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात नियमित गाड्यांशिवाय जादा वाहतुकीचे नियोजन आहे. दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण पाहता पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर (वाकडेवाडी) आणि स्वारगेट स्थानकांतून जादा बसेस धावणार आहेत. यांचे आरक्षणदेखील सुरू झाले आहे.
शिवाजीनगर (वाकडेवाडी)हून नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, सिल्लोड, चोपडा, धुळे, हिंगोली, जाफराबाद, जालना, कळंब, मलकापूर, लातूर, मेहकर, जामनेर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, परतूर, पुसद, शेगाव, तुळजापूर, उदगीर, उमरगा, वाशीम, यावल, यवतमाळ, बुलढाणा या मार्गांवर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
तर पिंपरी-चिंचवड बसस्थानकातून कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, गणपतीपुळे, महाड, दापोली, लातूरसाठी आणि स्वारगेट स्थानकातून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बारामती आणि भोर या मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.